या पोस्ट मध्ये आपण मुंबईचे आत्मवृत्त मराठी निबंध / Mumbaiche Manogat Essay In Marathi हे निबंध लेखन 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत
Mumbaiche Manogat Essay In Marathi
निबंध लेखन – मुंबईचे मनोगत
[मुद्दे : मूळ भूमी- सात बेटे – गरीब; पण सुखी लोक – मालकी बदलत गेली.- मुंबादेवीच्या नावावरून – मुंबई इंग्रज राज्यकर्त्यांनी केलेला विकास – बदललेले रूप, गिरण्यांचा प्रदेश, उपयुक्त बंदर – स्वातंत्र्याची चळवळ-महाराष्ट्राची राजधानी – विकास गर्दी – बकाल स्वरूप कसे वाचवायचे -हाच मोठा प्रश्न शहर ]
‘एक आटपाट नगर होते. तेथे एक राजा होता,’ अशी काही माझी कहाणी नाही. फार पूर्वी येथे लहान लहान सात बेटे होती- एकमेकांशी न जोडलेली. या बेटांवरचे लोक गरीब होते.
कुणी शेतात भात लावत, कुणी भाजी-मळा करीत, कुणाच्या नारळपोफळीच्या बागा होत्या. कुणी समुद्रातून, खाडीतून मासेमारी करीत. एकमेकांच्या गरजा भागवत ते सुखाने राहत होते.
पुढे या बेटांची मालकी पोर्तुगीजांकडे गेली. कुणा एका राजाने आपल्या बहिणीला ती लग्नात आंदण दिली. अशा त-हेने माझे हस्तांतर इंग्रजांकडे झाले. या राजांनी मात्र माझ्यात खूप सुधारणा केल्या.
वेगवेगळी असलेली सातही बेटे जोडली गेली. येथील मुंबादेवीच्या नावामुळे मला ‘मुंबई’ असे नाव मिळाले. इंग्रज अधिकाऱ्यांनी स्वत:ला राहण्यासाठी व स्वत:च्या कचेऱ्यांसाठी डौलदार दगडी इमारती बांधल्या आणि मग बघता बघता माझे स्वरूप बदलत गेले.
आज या इमारती प्राचीन स्थापत्यकलेचा आदर्श ठरल्या आहेत. मग येथे दिवे आले. आगगाडी धावू लागली. एकापाठोपाठ एक कापडाच्या गिरण्या निघाल्या. त्या गिरण्यांत काम करण्यासाठी कोकणातून व देशावरून माणसे येऊ लागली.
मग त्यांना राहण्यासाठी चाळी उभारल्या गेल्या. माझे मूळचे रूप कधी बदलले ते माझे मलाच कळले नाही. अनेक झाडे तोडली गेली. हिरवे जंगल लोप पावले आणि सिमेंटचे जंगल उभे राहिले. आता मोठमोठे कारखाने उभे राहू लागले.
कारण येथून पक्का माल बाहेर पाठवणे सोपे होते. मी ज्याप्रमाणे शहर आहे, त्याचप्रमाणे अत्यंत सुरक्षित व उपयुक्त असे एक बंदरही आहे. स्वातंत्र्याचा लढा उभा राहिला, तेव्हा मोठमोठ्या सभा येथे भरू लागल्या.
‘चले जाव’चा संदेश गांधीजींनी येथूनच दिला. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वातंत्र्याचा जल्लोष येथेच उडाला. स्वातंत्र्योत्तर काळात माझ्या रूपात फार मोठे बदल होत गेले. मी स्वतंत्र भारताची औदयोगिक नगरी बनले.
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मीया राज्याची राजधानी झाले. स्वातंत्र्योत्तर काळात खेड्यांची अधिकच दैना झाली. म्हणून मग ‘मुंबईत रोजी-रोटी मिळते’ हे कळल्यावर सगळीकडून लोकांचे लोंढे येथे येऊ लागले.
विविध धर्माचे, विविध जातींचे, विविध भाषा बोलणारे लोक माझ्या ठायी सुखाने राहू लागले. आपल्या या बहुढंगी रूपाचा मला अभिमान वाटतो. माझ्यावर वास्तव्य करणाऱ्या लोकसंख्येने आता तर दीड कोटींचीही मर्यादा ओलांडली आहे.
आता मात्र माझे सामर्थ्य कमी पडू लागले आहे. एवढ्यांना राहायला जागा कोठे आहे? मग उंच उंच टॉवर व झगमगलेले मॉल तोऱ्यात उभे आहेत. मोनोरेल व मेट्रो रेल्वे मुंबईत शान वाढवत आहेत.
रोज लाखो वातानुकूलित गाड्या मुंबईच्या रस्त्यावरून धावतात. पंचतारांकित हॉटेले गजबजलेली असतात. वाढदिवस, मुंज असल्या कार्यक्रमांसाठी हजारो रुपये उधळले जात आहेत. मुंबापुरी ही चैनपुरी बनली आहे.
दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. सर्वांना पुरेसे पाणी नाही. लोक वाटेल तेथे राहू लागले. हवा प्रदूषित झाली. कारखान्यांच्या सांडपाण्यामुळे हवा-पाणी दूषित झाले. जगातले दुसऱ्या क्रमांकाचे हे नगर आता बकाल झाले आहे.
कोणत्याही मूलभूत सेवा समाधानकारकतेने जनतेला पुरवणे अशक्य बनले आहे. गर्दी, गुन्हेगारी, अस्वच्छता, गलिच्छपणा, प्रचंड प्रदूषण, नागरी सुविधांचा प्रचंड तुटवडा, गलिच्छ झोपडपट्ट्या, बालकामगारांची पिळवणूक – अशा मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक गोष्टींनी माझे रूप विद्रूप झाले आहे.
आता ही स्थिती कोण बदलेल ? माणसाला साध्या निवांत सुखाचे दोन क्षण देणारे हे नगर, अशी निर्मळ प्रतिमा मला कोण मिळवून देईल बरं?
आम्हाला आशा आहे की मुंबई चे मनोगत मराठी निबंध लेखन / Essay on Mumbaiche Manogat In Marathi निबंध लेखन नक्कीच आवडले असेल धन्यवाद