या पोस्ट मध्ये आपण मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध | Me Pahileli Jatra Essay In Marathi निबंध लेखन करणार आहोत.
Me Pahileli Jatra Essay In Marathi
निबंध लेखन – मी पाहिलेली जत्रा/यात्रा
मुद्दे:- गावातील जत्रा – गाव माणसांनी फुललेले – देवळात मंगलमय वातावरण – देवळात आरास – देवळाच्या भोवताली विविध दुकाने – हिवताप निर्मूलन, कुटुंब नियोजन यांची दालनेही – एका बाजूला गुरांचा बाजार – बाजूलाच शेतीच्या अवजारांची दुकाने – फिरते पाळणे, खाऊची दुकाने – सगळीकडे आनंदीआनंद,
माझ्या गावात ‘जगदंबा देवी’ या ग्रामदेवतेचे देऊळ आहे. या आमच्या ग्रामदेवतेची जत्रा दरवर्षी चैत्री पौर्णिमेला भरते. जगदंबा देवीचा उत्सव म्हणजे संपूर्ण गावाचा सामुदायिक सोहळा असतो. चैत्रातील पुनवेच्या मागे-पुढे पाच-दहा दिवस देवळाचा परिसर नुसता फुलून गेलेला असतो.
यंदाच्या चैत्रीपुनवेला गावच्या जत्रेला जायची संधी मला मिळाली. मी खूश झालो. चैत्रीपुनवेच्या चार दिवस आधीच मी गावाला गेलो. गावात सगळीकडे आधीपासूनच उत्सवाचे वातावरण चालू होते. नोकरी निमित्त गावापासून दूर गेलेली माणसे जत्रेसाठी येत होती. त्यामुळे घरोघरी माणसांची वर्दळ वाढत चालली होती.
अखेर चैत्रीपुनवेचा दिवस उजाडला. पहाटे दूरवरून सनईचे मंगल सूर कानी पडत होता. त्यात नगाऱ्याचा मंद ठेका ऐकू येत होता. मंजूळ घंटानाद वातावरणात गुंजत होता. वाऱ्यालाही अबीराचा दरवळ सुटला होता! सारे वातावरण मंगलमय झाले होते. अशा पवित्र वातावरणात मी व माझा चुलत भाऊ जत्रेमध्ये फेरफटका मारायला निघालो.
रंगरंगोटी करून सजवलेले देवालय आपल्या भक्तजनांच्या स्वागतासाठी तयार होते. दीपमाळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश प्रभातीच्या धूसर वातावरणात दूरवर पसरला होता. गावातील युवकांनी मंदिर आणि त्याचा परिसर रंगीबेरंगी पताकांनी आणि फुलांच्या माळांनी सजवला होता. दिवस जसजसा पुढे जाऊ लागला, तसतशी जत्रा सगळीकडे उत्साहाने फुलत गेली.
मंदिराच्या परिसरात विविध दुकानांच्या रांगा लागल्या. देवीच्या ओटीसाठी खण, नारळ, फुले, हळद-कुंकू विकणारी दुकाने व प्रसादाचे विविध पदार्थ असणारी मिठाईची दुकाने देवालयाच्या परिसरात उभारली गेली होती. स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे इत्यादींची अनेक दुकाने रांगेत मांडलेली होती. काही दुकानांतून विविध प्रकारची खेळणी आकर्षकपणे मांडून ठेवलेली होती. कुटुंबकल्याण, हिवताप निर्मूलन यांची माहिती देणारी सरकारी दालनेही जत्रेत दिसत होती.
मंदिराच्या डाव्या बाजूला गुरांचा बाजार भरला होता. त्याला लागूनच शेतीची अवजारे, कांबळी, खते, कोंबड्या व त्यांचा आहार यांचीही काही दुकाने मांडलेली होती. देवीचे दर्शन घेऊन येणारे गावकरी या साऱ्या दुकानांत डोकावत होते; आवश्यक वस्तू खरेदी करीत होते. काही कुडमुडे ज्योतिषीही आपले नशीब अजमावत बसलेले होते. दुसऱ्यांचा भाग्योदय सांगताना त्यांचे भाग्य मात्र जोरात फळफळत होते.
लहान मुलांना आनंद देणारे फिरते पाळणे, गोल फिरणारी चक्रे व हॉटेलेही जत्रेत होती. एका बाजूला लाल मातीत कुस्त्यांचे फड रंगले होते. देवीच्या साक्षीने गावकरी हा सारा आनंद मनमुरादपणे घेत होते. साऱ्या जत्रेतून संध्याकाळ होईपर्यंत फेरफटका मारत होतो. तहानभूक तर साफ विसरून गेलो होतो. पुढच्या वर्षी जत्रेला येण्याचा संकल्प सोडून मी घराकडे परतू लागलो.
वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता
- मी पाहिलेली यात्रा मराठी निबंध दाखवा / Me pahileli Yatra Marathi Nibandh
- जत्रेत फिरायला गेलो वर मराठी निबंध / Jatret Firayla Gelo Var Marathi Nibandh
- जत्रा/यात्रा मराठी निबंध लेखन करा / Write Essay On Jatra/Yatra In Marathi
तुम्हाला मी पाहिलेली जत्रा/यात्रा वर मराठी निबंध / Essay Writting On Me pahileli Jatra/Yatra In Marathi हे निबंध लेखन कसे वाटले ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा धन्यवाद,