मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध | Me Pahilela Samudra Kinara Essay In Marathi

Me Pahilela Samudra Kinara Nibandh In Marathi: समुद्रकिनारा हे एक नैसर्गिक सौंदर्य आहे जे आपल्याला शांतता आणि विश्रांती ची अनुभूती देते. समुद्रकिनाऱ्यावर पोचल्यावर लाटांचा आवाज, थंड हवेचा स्पर्श आणि सूर्याची सोनेरी किरणे आपल्याला एक अद्भुत अनुभव देतात. समुद्रकिनाऱ्याची विशालता आणि तिथलं शांत वातावरण आपल्याला दैनंदिन जीवनातील ताणतणावांपासून दूर घेऊन जातं. ही अशी जागा आहे जिथे निसर्ग आणि माणूस अनोख्या प्रकारे भेटतात. या लेख मध्ये मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध लेखन १०० ते ४०० शब्दांमध्ये  दिलेले आहे.

Me Pahilela Samudra Kinara Essay In Marathi

[मुद्दे : समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्याचा क्षण-किनाऱ्यावर जाण्याची संधी-भोवतालचे एखादे दृश्य-लाटांचे दर्शन-मनाने दिलेला प्रतिसाद-किनाऱ्यावर दिसणारा अफाट अवकाश- क्षितिजाचे जाणवणारे रूप-किनाऱ्यावर फेरफटका- मनात येणारे विचार ]

समुद्राची गाज ऐकू आली, तेव्हाच जाणवले की, समुद्र जवळ आला. आणखी पुढे काही फुटांवर तर या गाजेने अवघा आसमंत व्यापून टाकला होता.  मातीतून, दगडांतून, झाडांतून, पानांतून, हवेच्या प्रत्येक कणातून मला गाज ऐकू येत होती.

आता माझ्या पावलांमध्ये अधीर गती आली. माझे मन समुद्राकडे झेपावू लागले. आम्ही किनाऱ्यावर पोहोचलो आणि सर्वांच्याच तोंडून ‘अहाहा!’ असा उल्हासाचा उद्गार बाहेर पडला. काही क्षण आम्ही त्या आल्हाददायक दर्शनात बुडून गेलो.

अनेक वेळा मी या किनाऱ्यावर आले आहे. माझ्या मावशीचे घर गोव्याच्या किनाऱ्यावरच्या हरमल या गावात आहे. हरमलचा किनारा म्हणजे गोव्याच्या किनाऱ्याची सुरुवात. विमानतळ, हमरस्ता यांपासून हरमल खूप दूर. त्यामुळे या किनाऱ्यावर माणसांची वर्दळ तशी कमीच.

त्यामुळे येथील किनारा कमालीचा स्वच्छ आहे. या किनाऱ्यावर मी दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ऋतूंत गेले आहे. जेव्हा जेव्हा मला तेथे जायला मिळते, तेव्हा तेव्हा मी बेहद्द खूश असते. आजही तसेच झाले होते.

आम्ही एका ठिकाणी चटया अंथरल्या आणि त्यावर स्थानापन्न झालो. किनाऱ्यावर वर्दळ कमी होती; पण चैतन्य पसरले होते. मुले खेळत होती. खेळत होती म्हणण्यापेक्षा खेळण्याच्या निमित्ताने समुद्रकिनारी हुंदडत होती.

पाण्यात गेलेल्या चेंडूला पकडण्यासाठी त्याच्यावर धबाधब झोकून देत होती. आपण कितीही वेगाने कोसळलो, तरी हा समुद्र आपल्याला आपल्या मजबूत, मऊ मऊ हातांनी वर उचलून घेणार याची त्यांना खात्री होतीच. मी निवांतपणे लाटांची क्रीडा निरखत होतो .

एका मागोमाग एक लाट किनाऱ्यावर झेपावे आणि आपला जोश वाळून झिरपवीत झिरपवीत वाळूवरच अलगद पसरे. गुबगुबीत गादीवर लहान बाळ अलगद लोळण घेते ना, अगदी तस्से! हे दृश्य खरोखरच मनोरम असते.

प्रत्येक लाट नित्यनूतन! तिचे किनाऱ्यावर लोळण घेणे वेगळे, नवीन आणि तिने वाळूत काढलेली नक्षीही प्रत्येक वेळी वेगळी, नवीन! आपण नीट कान दिला, तर लाट वाळूत झिरपतानाचा बारीक चुरचुर असा आल्हाददायक आवाज आपल्याही नात झिरपू लागतो.

या लाटा किती समजूतदारपणे वागतात! किनाऱ्याकडे येणारी लाट परतणाऱ्या लाटेला धडकत नाही, तर तिच्या डोक्यावरून अलगत पुढे सरकते- परतणाऱ्या लाटेला न दुखावता.

किनाऱ्याकडे झेपावणारी लाट मोठी असेल, तर ती उंच होते, थोडी वाकते आणि परतणाऱ्या लाटेला अलगद पोटात घेऊन किनाऱ्याकडे सरकते. ही लाट उंच होऊन पोटात वाकते ना, तेव्हा ती शेषशायी नारायणावर छत धरणाऱ्या शेषासारखी भासते!

समुद्रकिनाऱ्यावर कोणती गोष्ट मला मनोमन सुखावत असेल, तर ती म्हणजे आपल्या समोर सादर होणारा विस्तृत अवकाश. एवढी विस्तृतता आपल्याला इतरत्र लाभत नाही. शहरात तर नाहीच नाही.

किनाऱ्यावर मात्र, समोर अफाट पसरलेले पाणी, वर अपरंपार पसरलेले आकाश आणि या दोघांना सांधणारे अर्धवर्तुळाकार क्षितिज यांखेरीज काहीही नसते. समोर दिसणारे अर्धवर्तुळाकार क्षितिज हे एक लोभसवाणे दृश्य असते.

कधीही पाहा-ते निर्जीव, भावनाविहीन दिसणारच नाही. ते सतत लहरत असलेले दिसेल. त्यालाच लगडून लाटा फुटतात; फेसाच्या रूपात शुभ्र, कोमल जलपुष्पांचे गुच्छ तरळतात आणि अलवारपणे विरतात. ही शुभ्र फुले क्षितिजावर सतत उमलत असतात.

त्यामुळे क्षितिज नित्य स्मितहास्य करीत असल्यासारखे जाणवत राहते. अर्धवर्तुळाकार क्षितिजामुळे ‘पृथ्वी गोल आहे’ हे ज्ञान पहिल्यांदा शाळेत झाल्याचे आठवते आणि शालेय जीवनातील काही दिवस जागे होतात.

मन हळुवार होते आणि क्षितिज आणखी कोमल कोमल होत जाते! या किनाऱ्यावरच्या मऊ, बारीक व ओलसर वाळूत अनवाणी चालत चालत फेऱ्या मारणे हा माझा आवडता कार्यक्रम आहे.

चालता चालता मी समुद्रात पाय बुडवून कितीतरी वेळ उभी राहते. माझ्या पावलांवरून पाणी सुळसुळत जाते आणि पावलाखालची वाळू भुळुझुळु भुळुझुळु निघून जाते. प्रत्येक लाटेबरोबर हा अनुभव घेताना खूप छान वाटते.

त्या वेळी मनात येते की, मला छान वाटते, पण त्या पाण्याला काय वाटत असेल? काय म्हणत असेल ते? कोणते विचार येत असतील त्याच्या मनात? शेकडो नव्हे, हजारो नव्हे, लाखो नव्हे, तर काही कोटी वर्षांपासून हा समुद्र या पृथ्वीतलावर वावरतोय. असंख्य वेळा तो थंडीने गोठला असेल.

असंख्य वेळा सूर्याने त्याला भाजून काढले असेल. उंच इमारतींएवढ्या अजस्र त्सुनामी लाटांनी त्याला कित्येकदा तळापासून ढवळून काढले असेल. अब्जावधी अनुभव घेतले असतील त्याने. असा हा समुद्र माझ्यासमोर पसरलेला आहे… आणि माझ्या पाठीमागे जमिनीवर सर्व माणसे आहेत.

जणू या सर्व माणसांची प्रतिनिधी म्हणूनच मी येथे उभी आहे. आता या क्षणी मी मराठी नाही महाराष्ट्रीय नाही किंवा भारतीयसुद्धा नाही. कोणतीही जातपात, धर्म, प्रांत, भाषा वगैरे सर्व भेदांना ओलांडून केवळ एक माणूस म्हणून समुद्रासमोर उभी आहे. या समुद्रकिनाऱ्यावर माझी सर्व संकुचित कवचे गळून पडतात आणि मी विश्वात्मक बनत जाते.


निष्कर्ष

समुद्रकिनाऱ्यावरील अनुभव अनोखा असतो ज्यामुळे आपल्याला निसर्गाची विशालता आणि तिचे सौंदर्य जाणवते. तिथे घालवलेला वेळ आपल्याला मानसिक शांती तर देतोच, शिवाय जीवनातील वास्तवाची जाणीवही करून देतो. समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य आणि तिथले शांत वातावरण आपल्याला पुन्हा पुन्हा तिथे जाण्याची प्रेरणा देते, जेणेकरून आपण पुन्हा एकदा निसर्गाच्या कुशीत सांत्वन मिळवू शकू.

मी आशा करतो की मी पाहिलेला समुद्र किनारा निबंध/ Me Pahilela Samudra Kinara Nibandh Marathi नक्की आवडला असेल

Leave a Comment