एसटीतून उतरलो आणि सवयीने गोकुळ काकांच्या दुकानात गेलो. तेथे काही नवीन गोष्टींनी माझे लक्ष वेधून घेतले. पूर्वी साध्या तीन चार बरण्यांमध्येच आमचा खाऊ असायचा. बाकी सर्व अन्नधान्ये व घरगुती उपयोगाच्या अन्य वस्तू असत. काही काळाने कुरकुरे, चिप्स वगैरेंची पाकिटे तोरणा सारखी दारात लटकू लागली. आता विविध प्रकारची चॉकलेटे, गोळ्या, तऱ्हे तऱ्हेची बिस्किटे दुकानात दिसू लागली आहेत. एक रंगी बेरंगी चकचकीत बाटल्या असलेले शीत पेयांचे कपाट तेथे विराजमान झाले आहे. त्या शीतपेयांच्या कपाटाने हे बदल माझ्या मनात ठसठशीत केले आणि गावाकडे मी सजगतेने बघू लागलो.
कॉलेजांमुळे आमच्या गावात कपड्यांची फॅशन केव्हाच दाखल झाली आहे. मोबाईल तर आता जवळजवळ प्रत्येकाच्या हातात असतो. काहींनी तर मोबाईलमध्ये इंटरनेटही घेतले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप, फेसबुक वगैरे संकेतस्थळांवर ते सहज वावरतात. चॅटिंगच्या पलीकडे जाऊन आपली दैनंदिन कामे सुकर करण्यासाठीही विविध अॅपचा उपयोग ते सहज करतात. माझ्या एका मित्राने दुसऱ्या गावात असलेल्या त्याच्या भावाशी संपर्क साधून मुंबईला कोणते फणस पाठवायचे, याचा निर्णय घेण्यासाठी व्हॉट्सॲपचा सुंदर उपयोग केल्याचे मी पाहिले आहे.
आठदहा वर्षांपूर्वी आमच्या गावात तीन चार जणांकडेच गोबर गॅस प्लान्ट व शौचालय होते. आज प्रत्येक घरात गोबर गॅस व शौचालय आहे. त्यामुळे लाकडे तोडून आणणे व ती साठवणे ही कामे आता जवळपास थांबली आहेत. लोकांचा वेळ व श्रम मोठ्या प्रमाणात वाचले आहेत. शिवाय, जंगलावर होणारे आक्रमणही मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. नजरेत भरणारी एक बाब म्हणजे घरातले सांडपाणी मुरवण्यासाठी प्रत्येक घराशेजारी शोषखड्डे बांधले गेले आहेत. त्यामुळे घराभोवतालची दलदल पूर्णपणे नष्ट झाली आहे. तरीही, आपल्या घराभोवतालचा परिसर आकर्षक व प्रसन्न बनवण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत.
गावातील बदलांची नोंद माझे मन स्पष्टपणे घेऊ लागले. म्हणून मी माझ्या काकीशी या विषयावर बोललो. तिने मला आणखी माहिती दिली. अलीकडे गावच्या ग्रामसभेला गावकऱ्यांची भरपूर उपस्थिती असते. अनेक योजनांची माहिती दिली-घेतली जाते. शौचालय, गोबरगॅस, शोषखड्डे यांसारख्या योजनांचा गावकऱ्यांनी भरपूर फायदा करून घेतला आहे. तंटामुक्ती अभियानामुळे गावातील बहुतांश तंटे आता इथेच मिटत आहेत. गावात बचतगट सुद्धा स्थापन झाला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादींची कामे व त्या कामांचे स्वरूप यांची गावकऱ्यांना आता माहिती होऊ लागली आहे.
एसटी स्टँड, शाळा, ग्रामपंचायत, देऊळ इत्यादी ठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या गेल्या आहेत. कचऱ्याची विल्हेवाटही वेळच्या वेळी चांगल्या प्रकारे लावली जाते. पूर्वी ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर टीव्हीचा एक अँटेना होता. त्याऐवजी आता घरोघरी डीश-अँटेना दिसू लागले आहेत.
आणखी एक वेगळ्या प्रकारचा बदल माझ्या लक्षात आला आहे. आता गावातील न्हावी काका केशकर्तनाचे काम करीत नाहीत. कुंभार व चर्मकार यांनीही आपले व्यवसाय बंद केले आहेत. यातल्या बहुतेकांनी सरकारी कार्यालयांत नोकऱ्या पटकावल्या आहेत. टेलर काकांचा व्यवसाय कसाबसा चालू आहे; पण तोही जुन्या जुन्या लोकांच्या आधारावर ! गावाचा विकास होणे म्हणजे शहरासारख्या सोयीसुविधा व सुबत्ता गावात येणे; (Essay On My Changing Village) त्या अंगाने गावात बदल होणे. पण असे बदल आमच्या गावात झालेले दिसत नाहीत.
आमच्या आसपासच्या गावांतही नाहीत. गावचा खरा विकास व्हायचा असेल, तर गावातील उत्पन्नाची साधने वाढली पाहिजेत आणि उत्पन्नाचे प्रमाणही वाढले पाहिजे. तसे आमच्या गावात दिसत नाही. फारच थोडे लोक नोकरी पेशात आहेत. एकजण कुक्कुट पालन करतो. एक पिठाची गिरण आहे. दोन छोटीशी दुकाने आहेत. या ठिकाणी उत्पन्नापेक्षा उधारीच जास्त असते, असे माझी काकी म्हणाली. दूध डेअरीला लोक दूध देतात; पण त्यात कोणताही नियमितपणा नसतो. मुख्य उद्योग आहे तो शेतीचा. त्यात अजूनही काहीही बदल झालेला नाही. शेती अजूनही अनिश्चिततेच्या सावटाखाली असते. शेतीचे उत्पन्न कमी कमी होत असलेले दिसते.
खरे तर वैयक्तिक व सामूहिक पातळीवर प्रयत्न करून उत्पन्न वाढवायच्या योजना आखायला हव्या होत्या. बचतगटाला शाळेतील माध्यान्ह भोजनाचे कंत्राट मिळाले आहे; पण तेवढ्यावर न थांबता गावातील भाज्या, फळे वगैरे खादयपदार्थ हवाबंद करून विकण्याची योजना आखायला हवी होती. काजूचे बी भाजून फोडणे व त्यातील बी वेगळे करणे; आंबापोळी व फणसपोळी तयार करणे; चिक्की तयार करणे; आंबा, (Marathi Essay On Changing Village) पेरू व जांभूळ यांचे रस काढून ते हवाबंद करणे; औषधी वनस्पती लावणे; मसाल्याचे पदार्थ तयार करणे; कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणात करणे; तांदूळ व नाचणी यांची पिठे तयार करणे असे अनेक पदार्थ तयार करून ते हवाबंद करण्याची कामे मिळवायला हवी होती; पण यांतले काहीही होत नाही.
जोपर्यंत व्यापक भान ठेवून उत्पादन वाढवण्याचे विविध मार्ग अवलंबिले जाणार नाहीत, तोपर्यंत गावात खऱ्या अर्थाने विकासात्मक बदल घडून येणार नाहीत.