मित्र आणि मैत्रणींनो या पोस्ट मध्ये आपण आमच्या महाविदयालयातील स्नेहसंमेलन मराठी निबंध | Aamchya Mahavidyalayatil Sneh Sammelan Essay In Marathi हे निबंध लेखन करणार आहे.
Aamchya Mahavidyalayatil Sneh Sammelan Essay In Marathi
( मुद्दे : स्नेहसंमेलनाचा दिवस-रंगमंचावर नाटक सादर करण्याची धुंदी पडदयामागील कृतींमध्येही-सर्वांच्या अंगात संमेलनाचा संचार-संमेलनात माझा सहभाग-कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी-प्राध्यापकांच्या नकला, गायन, वादन, नर्तन, नाट्यछटा इत्यादी-गमतीदार स्पर्धा-संमेलन यशस्वी-सहभागाचा फार मोठा आनंद )
तो आमच्या स्नेहसंमेलनाचा दिवस होता. रंगमंचावर नाटक सादर होत होते. प्रेक्षकांनी सभागृह तुडुंब भरले होते. ते नाटकाचा आनंदाने आस्वाद घेत होते. त्याच वेळी रंगमंचामागे, पडद्याआड प्रचंड धावपळ, धांदल, उलघाल चालू होती. रंगमंचावर प्रवेश करण्यासाठी पुढच्या पात्रांना सिद्ध करण्यासाठी धडपड चालू होती.
त्यांची रंगभूषा करणे, वेशभूषा करणे, आवश्यक वस्तू त्यांच्या ताब्यात देणे, कोणत्या वेळी काय काय करायचे यांच्या सूचना देणे या बाबतची गडबड चालू होती आणि त्यातल्या त्यात ती मुले शेवटपर्यंत सराव करण्याचा प्रयत्न करीत होती. प्रत्येकजण धांदलीत वावरत होता. नाटकाची धुंदी प्रत्येकात संचारली होती.
कोणालाही अन्य काहीही सुचत नव्हते. शार्दुलची तर कमालच झाली. तो रंगमंचावर प्रवेश करीत होता. महाभारतातल्या एका प्रसंगातील ती एकांकिका होती आणि हा चालला होता चष्मा लावून! शिवाय खिशात मोबाईल! त्याला कोणीतरी सावध करताच, त्याने मोबाईल काढून मागच्या मागे फेकला. चष्माही भिरकावून दिला.
मोबाईलचे तुकडे झाले. चष्म्याची काच फुटली. पण त्याने मागे वळूनही पाहिले नाही! अभिनयाची धुंदीच मानगुटीवर बसली होती जणू! हे असे फक्त एकांकिकेबाबतच घडत होते, असे नव्हे. प्रत्येक कार्यक्रमात हेच चालले होते. सर्वजण जीव ओतून सादरीकरण करीत होते. तसेच, स्नेहसंमेलनाच्या दिवशीच नव्हे, तर स्नेहसंमेलन जाहीर झाले त्या दिवसापासून सगळ्यांच्या अंगात संमेलन संचारले होते.
वास्तविक पाहता, मला गायन-वादन, अभिनय, नृत्य वगैरे कोणतीच कला अवगत नाही. अभ्यासात ढ नसलो, तरी खूप हुशार विदयार्थ्यांमध्ये माझी गणना होत नव्हती. पण सरांनी माझ्यावर वेगळीच जबाबदारी सोपवली होती. आणि मी ती जबरदस्त ताकदीनिशी पेलली होती. सरांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व कार्यक्रमांची यादी केली. कार्यक्रमांत सहभागी विदयार्थ्यांची यादी केली.
त्यांना लागणारी रंगभूषा व वेशभूषा लिहून काढली. पोशाख व अन्य वस्तूंची यादी केली. या सर्व वस्तू भाड्याने आणताना मीच पुढे होतो. आणलेल्या सर्व वस्तू संबंधित विदयार्थ्यांना दिल्या. त्याची व्यवस्थित नोंद ठेवली. प्रत्यक्ष स्नेहसंमेलनाच्या दिवशी सर्व कलावंत विदयार्थ्यांची रंगभूषा व वेशभूषा व्यवस्थित केली गेली की नाही, याच्यावर देखरेख ठेवली.
खरे तर मी कोणत्याच कार्यक्रमात नव्हतो. तरीही मी सर्वच कार्यक्रमांमध्ये होतो. व्यवस्थापनाचा उत्तम अनुभव मला मिळत होता. सर्वजण जीव ओतून कामे करीत होते. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रम रंगतदार होत होता. सुदेश, कौस्तुभ, रागिणी व कविता यांनी ज्या नकला सादर केल्या, त्यांना तोडच नव्हती.
त्यातल्या त्यात प्राध्यापकांच्या नकला तर खूपच गाजल्या. टाळ्या व हशा यांनी सभागृह अक्षरश: दणाणून गेले होते. विशाखाचे अप्रतिम तबलावादन व त्याला अनुसरून केलेले निवेदिताचे सुरेख नृत्य यांची तर सर्वांनीच वाखाणणी केली. गाणी व नृत्ये हा तर सर्वच महाविदयालयातील स्नेहसंमेलनाचा प्राण असतो. आमच्या स्नेहसंमेलनात तसेच घडले.
गाण्यातील भाव व संगीताचे स्वरूप यांना अनुरूप अशी नृत्ये सादर केली गेली. नाट्यछटाही सादर केल्या गेल्या. काही नाटकांतील एकपात्री प्रवेश सादर केले गेले. सर्वच कार्यक्रम रंगतदार होते. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे होते. एकापेक्षा एक रंगतदार कार्यक्रमांमुळे सर्वच प्रेक्षक खूश झाले होते. शेवटी दोन-तीन गंमतीदार स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या.
एका मिनिटात ठरलेली कृती पार पाडायची, असे त्यांचे स्वरूप होते. उदा., एक पाण्याने भरलेली बादली स्टुलावर ठेवली होती. त्यात एक मोसंबे ठेवले होते. स्पर्धकाने आपले हात पाठीमागे बांधून फक्त तोंडाने ते मोसंबे एका मिनिटाच्या आत उचलायचे. असे त्या स्पर्धेचे स्वरूप. ते मोसंबे उचलताना गमतीजमती घडत होत्या. काहीजणांनी तर बादलीत डोकेच बुचकळवले होते.
त्या वेळची ती धडपड पाहून सगळ्यांची हसता हसता मुरकुंडी वळत होती. एकंदरीत संमेलन यशस्वी रितीने पार पडले. या संमेलनाने आम्हांला खूप गोष्टी शिकवल्या. कार्यक्रमांची आखणी कशी करायची, ते वेळेवर कसे पार पाडायचे, कोणालाही न दुखवता कामे कशी करायची? प्रत्येकाची क्षमता लक्षात घेऊन जबाबदारी कशी सोपवायची वगैरे अनेक बाबींचे शिक्षण मिळाले.
आम्ही सर्वजण या संमेलनाच्या आयोजनातून घडत होतो. जे पाठ्यपुस्तकातून मिळत नव्हते, ते येथे मिळत होते. जे वर्गात घडत नव्हते, ते येथे घडत होते. मी तर एक सामान्य विदयार्थी असामान्य ठरलो होतो. मी कधीही हे संमेलन विसरणार नाही.
वरील निबंध खालील विषयावर देखील लिहू शकता
- शाळेतील स्नेह संमेलन मराठी निबंध | Shaletil Sneh Sammelan Marathi Nibandh
- स्नेह संमेलन निबंध मराठी मध्ये | Sneh Sammelan Essay In Marathi
- माझ्या विद्यालयातील स्नेह संमेलन वर मराठी निबंध | Essay On majhya Vidyalayatil Sneh Sammelan In Marathi
हे निबंध सुद्धा नक्की वाचा
- असा रंगला सामना मराठी निबंध
- आमची मुंबई मराठी निबंध
- भूक नसतीच तर मराठी निबंध
- मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध
- थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध
- पावसाची विविध रूपे मराठी निबंध
तुम्हाला आमच्या महाविदयालयातील स्नेहसंमेलन मराठी निबंध / Essay On Aamchya Vidyalayatil Shen Sammelan In Marathi हा निबंध नक्कीच आवडले असेल धन्यवाद,