श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध | Shravanmasi Harsh Mansi Essay In Marathi

Shravanmasi Harsh Mansi Nibandh In Marathi: श्रावण महिना भारतीय सांस्कृतिक परंपरेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंददायी मानला जातो. या महिन्याचा आगमन होताच निसर्गाच्या सान्निध्यात एक नवा रंग उभा राहतो. पाऊस आणि हरित वसुंधरेची जणू काही जादूच निसर्गात भासते. श्रावण हा महिना फक्त निसर्ग सौंदर्याने भरलेला नाही, तर त्यासोबत धार्मिकता, संस्कृती आणि भक्तीचा एक उत्सवी माहोल निर्माण करणारा असतो. त्यामुळेच ‘श्रावणमासी हर्ष मानसी‘ असे सहजपणे मनातून उद्गार येतात. आज या लेखात मी श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध लेखन 100 शब्दांमध्ये केलेले आहे.

Shravanmasi Harsh Mansi Essay In Marathi

( मुद्दे : आनंदाचा महिना रमणीय निसर्ग टवटवीत हिरवीगार वनश्री रिमझिम पाऊस- व्रतवैकल्यांना महत्त्व विविध देवतांच्या पूजेचे विविध प्रकार लेखक- वेगवेगळ्या देवतांना वेगवेगळी पत्री-फुले कवींचा आवडता महिना)

‘तुझा आवडता महिना कोणता?’ असा प्रश्न जर का कोणी मला विचारला, तर मी पटकन सांगेन, ‘श्रावण!’ श्रावण हा महिना आहेच तसा. कोणालाही आवडेल असा! आल्हाददायक! प्रसन्न ! श्रावणात आनंदाची लयलूटच असते. लहानथोर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच विलसत असतो. सर्वांच्या या आनंदालाच बालकवींनी ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ हे अजरामर शब्दरूप दिले आहे.

श्रावणात निसर्ग जे रमणीय रूप धारण करतो, तसे तो अन्य कोणत्याही महिन्यात करीत नाही. झाडे, वेली, वने टवटवीत बनून सुहास्यवदनाने डोलत असतात. धरती जणू आपल्याभोवती हिरवे सुखच लपेटून घेते. जिकडे पाहावे तिकडे हिरव्या रंगाचे चैतन्य पसरलेले. हिरव्या रंगाच्या विविध छटा वातावरणात लहरत असतात.

श्रावणात पावसाच्या अलवार सरी रिमझिमत येतात. तसेच, त्या येतात न येतात तोच अदृश्यही होतात अन् ऊन पसरू लागते. तेवढ्यात पुन्हा सरी अवतरतात. ऊनपावसाचा असा खेळ चालता चालता कधी कधी उन्हातच पाऊस बरसू लागतो. पावसाचे थेंब सूर्यप्रकाशात झगमग झगमग करीत उतरतात.

त्यामुळे श्रावणातील ऊनही रेशमी मुलायम स्पर्श घेऊनच येते… आणि ते अवचित अवतरणारे सप्तरंगी तरल इंद्रधनुष्य ! हा तर श्रावणाचा खास अलंकार ! श्रावणात सर्व वृक्ष-वेली टवटवीत बनतात. त्यांना फुलांचा बहरही आलेला असतो. त्यामुळे श्रावणातील पूजांमध्ये विविध पत्री-फुलांना खूप महत्त्व येते. किंबहुना श्रावणातील समृद्ध निसर्गामुळे तृप्त बनलेल्या माणसाला परमेश्वराची आराधना करण्याची प्रेरणा मिळते.

परमेश्वराची आराधना करण्याच्या प्रेरणेमुळे श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना बनला आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील काही दिवस कोणत्या ना कोणत्या देवदेवतेसाठी राखून ठेवलेला आहे. या देवतांचे पूजांचे प्रकार वेगळे, त्यांना लागणारी पत्री-फुले वेगळी. शुक्रवारच्या जिवतीला आघाडा वाहावा लागतो, तर शनिवारी शनीला रुईच्या पानाफुलांची ओढ लागलेली असते.

सोमवारी शिवाला बेलाचे पान वाहायचे, तर मंगळागौरीला कितीही फुले वाहिली तरी कमीच ! परंतु सुवासिक केवड्याचा मान तेथे मोठाच. या सगळ्या व्रतवैकल्यांमध्ये अतिथीला खास प्रतिष्ठा मिळते. श्रावण महिना माणसातील भूतदया जागवतो. निसर्गापुढे तो लवतो. म्हणून तर श्रावणात नागाची देखील पूजा होते. सागराला नारळ वाहिला जातो.

बहीण-भावातील प्रेमाचे नाते रक्षाबंधनाने अधिक घट्ट करण्याचे काम श्रावणच करतो. दरवर्षी गोकुळाष्टमीला सगळे भक्त भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. तर शेतकरी श्रावण सरता सरता आपल्या कष्टाळू सहकाऱ्याची, बैलाचीही पूजा करतात. अशा या श्रावणाने लेखक-कवींना मोहित केले नसते, तरच नवल! श्रावणाने मोहित झालेले लेखक-कवी मग त्याचा वेगवेगळ्या शब्दांत गौरव करतात.

दुर्गा भागवत त्याला ‘हिरवा श्रावण’ म्हणतात. कुसुमाग्रजांना तो ‘हसरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा’ वाटतो. असा हा चैतन्यमय श्रावण माझा आवडता महिना आहे.


निष्कर्ष

श्रावण महिना आपल्याला निसर्गाची आणि संस्कृतीची जोडलेली जाणीव करून देतो. त्यातील सौंदर्य आणि पावित्र्य मनाला शांतता आणि आनंद देणारे असते. हा महिना केवळ पाऊस आणि निसर्ग पूजनाचा नाही, तर समाजातील एकोप्याचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा प्रतीक आहे. श्रावणाचे महत्व आपल्या जीवनात कितीही आधुनिकता आली तरी कायमस्वरूपी टिकून राहणार आहे, कारण त्यातली सजीवता आणि सकारात्मकता सर्वांनाच भावते. मित्र-मैत्रिणीनो तुम्हाला हा श्रावणमासी हर्ष मानसी निबंध/ Shravan Masi Harsh Mansi Marathi Nibandh नक्की आवडला असेल

Leave a Comment