मी राष्ट्रध्वज बोलत आहे मराठी निबंध | Me Rashtradhvaj Bolat Aahe Essay In Marathi

या पोस्ट मध्ये आपण मी राष्ट्रध्वज बोलत आहे मराठी निबंध लेखन / Me Rashtradhvaj Bolat Aahe Essay In Marathi 100 ते 400 शब्दांमध्ये करणार आहोत.

Me Rashtradhvaj Bolat Aahe Essay In Marathi

निबंध लेखन – मी राष्ट्रध्वज बोलत आहे

[मुद्दे : राष्ट्रध्वजाचा संवाद साधण्याचा प्रसंग- देशाची घोटाळ्यांचा देश ही प्रतिमा या प्रतिमेतून बाहेर पडण्याची आवश्यकता-पूर्वी तिरंग्यासाठी अनेकांकडून त्याग- स्वातंत्र्यपूर्व  काळातील त्यागाची आता गरज नाही भारतीयांनी विविध क्षेत्रांत कर्तबगारी गाजवण्याची गरज देशाला नुकसानकारक असे कोणतेही कृत्य नको]

“माझ्या प्रिय भारतवासीयांनो, “आज या लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारताचे प्रतीक म्हणून तुमच्याशी संवाद साधताना मला, या राष्ट्रध्वजाला, मनापासून आनंद होत आहे.

“गेली काही वर्षे मला चिंतेने घेरले होते. देश आता रसातळाला जाणार, या विचाराने जिवाचा थरकाप होत होता. राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, खाण घोटाळा, वाळू घोटाळा, रॉकेल घोटाळा, स्टॅप घोटाळा, सिंचन घोटाळा, टोल घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांनी देश दररोज हादरत होता.

प्रत्येक घोटाळ्यात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार. देशाच्या तिजोरीची राजरोस लूट चालली होती. ‘भारत म्हणजे घोटाळ्यांचा देश’ अशीच प्रतिमा जगभर तयार होत होती. घोटाळ्यांच्या या चिखलातून देश कधी बाहेर पडू शकेल की नाही, या शंकेने मन व्याकूळ होत होते.

“पण काही दिवसांपूर्वी आपल्या पहिल्याच भाषणात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची ‘घोटाळ्यांचा देश’ ही प्रतिमा बदलून त्याला ‘कौशल्यांचा देश’ बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या वेळी आनंदाच्या लाटा माझ्या देहात उसळल्या.

नागरिकांच्या कर्तबगारीवरून देशाची ओळख होते, हे देशाच्या नेत्याच्या लक्षात आले, याचा मला खूप आनंद झाला. “मित्रांनो, आजवर अनेकांनी माझ्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली.

स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी सर्वांगावर लाठ्या झेलल्या, छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या; पण त्यांनी माझा कधी अवमान होऊ दिला नाही. हे स्वातंत्र्यसैनिक देशासाठी हसत हसत फासावर चढले तेही मला छातीशी कवटाळून! ते सारे रोमांचकारक सोनेरी क्षण आठवताच आजही माझे मन अभिमानाने भरून येते.

“पण खरे सांगा… आज अशा त्यागाची गरज आहे का? शत्रू आहेतच, अतिरेकीही हैदोस घालत आहेत. पण यांचे निर्दालन करायला आपले सैन्य समर्थ आहे. त्यांना राजकीय पाठबळ मिळाले, तर ते या सर्व शबूंचा नायनाट करतील, अगदी सहज!

“मित्रांनो खरी गरज आहे ती लोकांच्या सहभागाची. त्यांच्या इच्छाशक्तीची. आपण जपान्यांसारखे केले पाहिजे. दुसऱ्या महायुद्धात जपान बेचिराख झाला. पण त्या राखेतूनही तो फिनिक्सप्रमाणे भरारी मारून वर आला.

त्या खडतर काळात जपान्यांनी अक्षरश: रक्ताचे पाणी केले. अंगावर पडेल ते काम आनंदाने केले. मिळेल ते काम आपले मानले. जे करायचे ते आत्यंतिक निष्ठेने. नेहमी अव्वल दर्जाच राखायचा.

मोकळ्या वेळात त्यांनी घराभोवतालच्या जागेत भाजीपालाही पिकवला. त्यांनी देश हाच देव’ आणि ‘देश हाच धर्म’ मानला. वीस-पंचवीस वर्षांत त्यांनी देशाचा चेहरामोहराच बदलून टाकला.

‘मेड इन जपान’ म्हणजे उत्कृष्ट दर्जा ही जगन्मान्य मोहोर उमटवली. जगभरात जपानला अव्वल दर्जा मिळवून दिला. “आपणही असेच केले पाहिजे. आपापल्या क्षमतेनुसार जमेल ते काम आवर्जून केले पाहिजे.

वाट्याला आलेले काम कष्टपूर्वक, मनापासून व नेकीने केले पाहिजे. आपली अर्थव्यवस्था आता भरभराटीच्या टप्प्यावर आली आहे. शेकडा प्रकारची कामे उपलब्ध आहेत. करणाऱ्याला दहाही दिशा मोकळ्या आहेत.

आम्हाला आशा आहे की मी राष्ट्रध्वज बोलत आहे मराठी निबंध / Me Rashtradhvaj Bolat Aahe Marathi Nibandh नक्कीच आवडले असेल धन्यवाद