आपण या पोस्ट मध्ये मी खुर्ची बोलत आहे मराठी निबंध / Me Khurchi Bolat Aahe Essay In Marathi निबंध लेखन करणार आहोत
Me Khurchi Bolat Aahe Essay In Marathi | मी खुर्ची बोलत आहे
[ मुद्दे : खुर्ची-पहिल्यांदा बोलण्याची संधी माझे (खुर्चीचे) सुरुवातीचे रूप- माणसाची भटकंती संपल्यावर बनलेले रूप- खुर्चीची अनेक रूपे, अनेक कामे माणसाला विसावा, आराम, सुख देण्याची धडपड – परोपकारी वृत्ती ]
मित्रांनो, आज खरोखरच माझं भाग्य उजळलं आहे, असं वाटतं! आजपर्यंत तुम्ही माणसांनी माझा खूप उपयोग करून घेतला; पण माझ्या भावना जाणून घेण्याचा कधी कोणी प्रयत्न केला नाही. आज मात्र मला बोलण्याची संधी मिळत आहे!
हजारो वर्षांनंतर माझ्या कंठातून आज शब्द बाहेर येत आहेत. हे शब्द ऐकणारा कोणीतरी समोर आहे, हे दृश्य किती सुखावणारे आहे! मित्रांनो, लक्षात घ्या, मी हजारो वर्षांपूर्वीपासून माणसाची सोबत करीत आले आहे.
माणूस आदिमानवाच्या रूपात टोळ्याटोळ्यांनी वावरत होता. जिवापाड कष्ट करून शिकार मिळवत होता. उन्हातान्हातून, थंडीवाऱ्यातून, काट्याकुट्यांतून, दगडधोंड्यांतून मैलोन्मैल पायपीट केल्यावर थकलाभागला जीव जमिनीवर टेकायचा; विसावा घ्यायचा.
अशाच पायपिटीत त्याला केव्हातरी उमगले की, पाय मोकळे सोडून उंच दगडावर बसले की शरीर सुखावते, मनाला आल्हाद मिळतो. तशातच पाठ टेकून बसायला मिळाले की, मिळणाऱ्या सुखाचे वर्णनच करता येणार नाही!
माणसाला आलेल्या या प्रत्ययातूनच, या अनुभूतीतूनच माझा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात पाठीला आधार देणारी व पाय मोकळे सोडून बसता येणारी सपाट जागा-असंच माझं ओबडधोबड रूप होतं.
हळूहळू सपाट दगड खास शोधून आणून त्यांची मांडणी करण्याची कल्पना माणसाला सुचली. ती त्याने अमलातही आणली. कालांतराने माणसाला शेतीचा शोध लागला. त्याची भटकंती थांबली आणि माझ्या रूपातही बदल होऊ लागला.
झाडाच्या फांदया तोडून त्या वेलींनी बांधून बसण्याची सोय करणे अधिक सोपे आहे, हे त्याच्या लक्षात आले. लोखंडी हत्यारे लाभल्यानंतर मात्र माझे रूप अधिकाधिक देखणे होऊ लागले. मी माणसाच्या अधिक सहवासात आले.
आज तर खुर्चीवर बसलेला नाही वा खुर्ची ठाऊकच नाही, असा माणूस जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. मित्रांनो, किती रूपांत आणि किती ठिकाणी मी मानवाची सोबत करते! कोणत्याही घरात डोकावा. तेथे मी निरनिराळ्या रूपांत हजर असते.
मग घरात वावरणारी माणसे येता-जाता विसाव्यासाठी माझा उपयोग करतात. अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्याला मी बसण्याची सोय करून देते. घरात आलेल्या पाहुण्याला आदराचे स्थान देण्यासाठी मीच पुढे होते. घरातल्या वृद्ध व्यक्तीला किंवा थकल्याभागल्या जिवाला आराम देण्यासाठी मी आरामखुर्चीचे रूप घेते.
दिवसभराचा शीण घालवून मनाला आल्हाद मिळवण्यासाठी घटकाभर बागेत येणाऱ्या आबालवृद्धांसाठी मी तेथे हजर होते. रेल्वेगाडीची वाट पाहून पाहून दमलेल्या प्रवाशांच्या पायांना आराम मिळावा म्हणून मी तेथे धाव घेते. मोठ्या कंपनीच्या मॅनेजरचा रुबाब वाढवण्यासाठी मीच रुबाबदार रूप धारण करते.
हॉटेले, सिनेमागृहे व सभागृहे येथे माझ्याशिवाय पानच हलणार नाही. लग्नसमारंभात वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मित्रपरिवाराच्या सेवेला मी हजर असतेच; पण वधूवरांना राजाराणीचं लावण्य मिळावं म्हणून मीच राजेशाही रूप धारण करते.
दंतवैदयाच्या दवाखान्यातील माझा डौल तर काय विचारूच नका ! केशकर्तनालयातील माझे रूप किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे तुम्ही पाहिले असेलच ! आमदार-खासदार वा मंत्री यांच्या कार्यालयांत मी असते, तेव्हा माझा जबरदस्त दरारा असतो आणि मला पराकोटीचे सामर्थ्य प्राप्त होते!
असे माझे किती प्रकार सांगू ? सांगत बसले तर कित्येक तास पुरणार नाहीत. तरीही माझे हे चार शब्द ऐकून घेतलेत, हे काय कमी आहे? मित्रांनो, माझ्यासारखेच परोपकारी बना आणि पाहा किती आनंद मिळतो ते!
वरील निबंध खालील विषयांवर देखील लिहू शकता
- मी खुर्ची बोलते मराठी निबंध / Me Khurchi Bolate Marathi Nibandh
- खुर्चीचे मनोगत मराठी निबंध / Khurchiche Manogat Marathi Nibandh
- खुर्ची वर निबंध मराठी मध्ये / Essay Writing On Chair In Marathi
हे सुद्धा वाचा
आम्हाला आशा आहे की मी खुर्ची बोलत आहे मराठी निबंध / Essay On Me Khurchi Bolat Aahe In Marathi हे निबंध लेखन नक्कीच आवडले असेल धन्यवाद,